Friday, January 26, 2007

मावळत्या दिनकरा....

Sunday, February 12, 2006

आकाशवाणी मुंबई केंद्र....

"आकाशवाणी मुंबई केंद्र. सकाळची ७ वाजून ५ मिनिटे झाली आहेत. आता आम्ही पुणे केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत". हे वाक्य कानावर पडून बरेच वर्ष झाली आहेत. पण अजूनही या वाक्याची जादू माझ्यासाठी कमी झालेली नाही. अजुनही भूतकाळाच्या, बालपणाच्या आठवणीत आकाशवाणीचे महत्वाचे स्थान आहे. लहानपणी माझ्या दिवसाची सुरूवात रेडिओने व्हायची. ७:३० ची सकाळची शाळा, तेव्हा वेळेत तयार होण्यासाठी आई ६-६:१५ ला उठवायची. सकाळचे अभंग सुरू असायचे. प. भीमसेन जोशींचे लोकप्रिय अभंग कानवर पडायची हीच वेळ. 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल', 'सावळे सुंदर' या सारख्या अभंगांची गोडी तेव्हाच नकळत लागली. त्याच बरोवर लता मंगेशकरांच्या आवाजात 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन' सारख्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगानी दिवसाची परफेक्ट सुरूवात व्हायची. ७ वाजता आरोग्य धनसंपदा सादर व्हायचे, सादरकरत्या होत्या 'सुषमा हेप्पळगावकर'. ५ मिनिंटांचे हे सुंदर सदर. पुढे प्रादेशिक बातम्या आणि कोकणीतल्या 'खोबरो'. फारश्या कळायच्या नाहित, पण ऐकायला फार आवडयच्या, त्यावेळी मी त्याला कोकणी खोबरं म्हणायचो. सकाळच्या वेळीच आकाशवाणी विविध वस्तूंचे दर प्रसारित करायचे, बहुतेक व्यापाऱ्यांसाठी हे सदर होते, कारण दर क्विंटल मधे असायचे. आकाशवाणी च्या बातम्यांचे एक वैशिठ्य होते, ते म्हणजे वृत्तनिवेदकांची बोलण्याची लकब किंवा पद्धत. मल हि पद्धत फार आवडायची, म्हणुन कि काय धडे वाचताना मी त्याच पद्धतीने वाचायचो. सकाळी ११ वाजता 'कामगार बंधुसाठी' गाण्याचा सुरेख कार्यक्रम असायचा आणि दुपारी १ वाजत 'भगिनी समाजासाठी वनिता मंडळ' सादर केले जायचे, याचे सुरूवातीचे संगीत फार छान होते, आत फारसे आठवत नाही. बालगीतांची मेजवानी सुद्धा आकशवाणी पुरवत असे, 'नाचरे मोरा' पुस्तकात शिकायच्या आधीपासून तोंडपाठ होते. 'टप टप टाकीत टापा', 'सांग सांग भोलानाथ', 'या बकुळीच्या झाडाखाली' हि गाणी आजही मनात रुंजी घालत आहेत, तर पाउस पडताना 'ए आई मला पावसात जाउदे' अजुनही आठवते. बहुतेक ८-८:१५ वाजता भावगीतांचा सुरेख कार्यक्रम असायचा, कॉलेजच्या काळात घरातून उशिरा निघत असल्याने दिवसाची सुरूवात त्यानेच व्हायची. भावगीतांबरोबर नाट्यगीतांची आवडही त्या काळात आकाशवणीनेच पोसली. एकुणच आकशवाणीने केलेली वातावरण निर्मिती अतिशय सकस होती, कुठलाही डमडौल न वागवता एक स्वत:चा श्रोतृवर्ग तयार केला, जोपासला, म्हणुनच त्याची मोहिनी अजुनही मनात कायम आहे.

आजच्या काळात दिवसाची सुरूवात आकाशवाणीने होत नाही, ती जागा इच्छा नसतानाही 'एफ़ एम' रेडिओने घेतली आहे. पण अजुनही वाटते कि पुन्हा एकदा तेच आवाज कानावर पडावेत आणि पहिल्यासारखीच दिवसाची एक 'परफेक्ट' सुरूवात व्हावी. ...समाप्त.

Monday, October 31, 2005

दखल

'बंग' दांपत्याच्या कामगिरीची जगप्रसिद्ध 'टाइम' मासिकाने ह्या वेळी दखल घेतली आहे. २-नोव्हेंबर च्या अंकात त्यांनी गडचिरोली सारख्या दुर्गम भागात बालमृत्यू निवारण, कुपोषण ह्या क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती दिली जाणार आहे. 'टाइस्म ग्लोबल हेल्थ समिट' मधे बालमृत्यू संबंधित आपले अनुभव मांडण्याची संधी ही त्यांना मिळाली आहे.

दोन-एक वर्षापुर्वी महाराष्ट्र भुषण या पदवीने डॉ. अभय आणि राणी बंग या दोहोंना गौरवण्यात आले होते. त्यानंतरही सातत्याने वृत्तपत्रांमधे आपल्या कार्यामुळे ते चर्चेत राहिले. बंग यांनी केलेल्या आरोग्यसमितीच्या शिफारशींचा सरकारने नोंद घेण्यापलीकडे काही उपयोग केला नाही हे मेळाघाट या बालमृत्यू प्रकरणात आपल्या समोर आलेच.

काही वर्षांपुर्वी डॉ. अभय बंग यांचे 'माझा साक्षातकारी ह्र्दयरोग' हे सुरेख पुस्तक वाचनात आले. वयाच्या ४४व्या वर्षी अचानक उद्भवलेल्या या रोगाच्या रुपाने साक्षात मृत्यच त्यांच्या समोर उभा ठाकला होता. पण याही परिस्थितीत त्यांच्या मनाने उभारी घेतली आणि या आजारापासुन स्वताची सुटका करुन घ्यायचा त्यांनी चंगच बांधला. व्यायाम आणि आहार नियंत्रण या शास्त्रोक्त पद्धतीचा त्यांनी आधार तर घेतलाच, पण त्याच्या जोडीला त्यांनी अध्यात्माचीही कास धरली. या ह्रुदयरोगाचे मुळ आपल्या विचारपद्धतीत, परिणामी जीवनप्द्धतीत आहे हे जाणुन घेउनच त्यांनी हे पाउल उचलले. समाजकार्याने प्रेरित असलेली माणसे सुद्धा चांगल्या कार्याच्या निमित्ताने का होइना पण मानसिक तणावा खाली असतात. त्याची परिणीती पुढे ह्रुदयरोगात होण्याची संभावना जास्त असतेच. डॉ. नीतु मांडके याच्या अकस्मात मृत्यूनंतर बंग यांचे ह्र्दयरोगाच्या या कारणाचा उहापोह करणारे लेख आले होते. आजच्या आपल्या धकाधकीच्या आयुष्यात मार्गदर्शक ठरावे असेच हे पुस्तक आहे.

सामाजिक आरोग्य ह्या क्षेत्रात काम करणाऱ्य त्यांच्या 'सर्च' या संस्थेची माहिती अनिल अवचट यांच्या लेखा द्वारे आधी वाचनात आली होती. जागतिक पातळीवर त्यांच्या कार्याची या आधीही नोंद घेतली गेली असेल या बाबत काही शंका नाही, परंतु आपल्या इतर प्रसिद्धी माध्यमांचे या घटनांकडे डोळेझाक करणे थोडे अस्वस्थ करते. आजच्या डॉक्टर्स ना सुद्धा त्यांच्या कार्याची ओळख नाही, तर सर्व सामान्य जनतेचे सोडुनच द्या. तरिही यासारख्या गोष्टींनी काहिही फरक न पडता बंग दांपत्य आणि त्यांसारखे इतर समाजकर्मी आपली कामे करतच राहतील. त्यांच्या कामापासुन अनेकांना स्फुर्ती मिळावी हीच इच्छा.Reference Links:

http://www.loksatta.com/daily/20051101/mp06.htm

http://in.rediff.com/news/2003/apr/24maha.htm

http://www.ashoka.org/fellows/viewprofile3.cfm?reid=147712

Monday, October 24, 2005

मराठी चित्रपटांचा 'श्वास'

मागच्या रविवारी पालेकरांचा 'बनगरवाडी' पाहिला. माडगुळकरांच्या पुस्तकातील कथेला किती न्याय दिला आहे हा मुद्दा माझ्या दॄष्टीने महत्वाचा नाही. कोणतेही सरळ आणि प्रामणिक भावनेने केलेले प्रयत्न सर्वांनाच भावतात असे मला तरी वाटते. असो, चित्रपट पाहाताना शाळेत वाचायला मिळालेल्या या पहिल्या पुस्तकाची आठवण झाली. शेवटच्या बाकावर बसण्याचा परिणाम कि काय पण हे सर्व मुलांच्या दॄष्टीने त्याज्य पुस्तक माझ्या नशिबी आले. काहिच पर्याय नव्ह्ता म्हणुन घरी नेले आणि अगदीच वेळ जात नव्हता म्हूणुन वाचायला ही घेतले. व्यंकटेश माडगुळ्करांची हि माझी पहिली ओळख. पहिल्याच पुस्तकात त्यांच्या शैलीने वेड लावले. शाळेतल्या मुलांनाही गुंगवून ठेवतील अशी त्यांची कथा सांगण्याची हातोटी. अर्थात हे काही कोणाला नवल नाही. पण चित्ररुपाने हि कथा पाहाताना पुस्तका एवढी मजा आली नाही. नेहमी प्रमाणे मात्र मी त्याची कारणमीमांसा करत बसलो नाही. एकतर पुस्तक वाचुन वर्ष उलटली होती, त्यामुळे काय ठेवलय काय गाळलय याचा अंदाज येणे कठिणच होते. आणि माझ्या आवडत्या पुस्तकावर आधारित असल्याने थोडा 'बायस' होणे स्वाभाविक होते. पण मराठी भाषेमधे चांगले चित्रपट काढण्याचे प्रयत्न होत आहेत पाहुन मात्र बरे वाटले. अमेरिकेत असताना 'श्वास' पाहिला होता. पिक्चर आवडला होता, पण कथेचा जीव इतका छोटा होता कि त्याचा परिणाम फार मोठा होणे कठिणच होते. नाही म्हणायला त्यामधील एक गोष्ट खटकली होती. डोळ्यांचे ओपरेशन होण्याच्या आधी त्याच्या आजोबांना त्या लहानग्या मुलाला अशा गोष्टी दाखवाव्याशा वाटतात कि ज्या त्याला कधी पाहायला मिळणार नाहीत. सर्कस, पिक्चर, बाग, शहर अशा सर्व गोष्टी ते त्याला दाखवतात. त्या मुलाचा जीव तेवढाच सुखावतो. पण मग त्याच्या आईला पाहुन घेण्याची इच्छा नसावी? एवढ्या सर्व गोष्टीत ही एक महत्वाची घटना रंगवायची दिग्दर्शक राहुन गेला, असे राहुन राहुन वाटते. तरी चित्रपटाची एवढी मजल पाहुन कोणत्याही मराठी माणसाला अभिमान वाटेल हे मात्र नक्की खरे.

पुण्यात असताना 'अनाहत' पाहाण्याचा योग आमच्या मित्रमंडळी मुळे आला नाही, पण ती हि हौस अमेरिकेत असताना पुर्ण करुन घेतली. सोनाली बेंद्रे सोडली तर त्या पिक्चर मधे खास असे काहिच वाटले नाही. अर्थात मी टेक्निकल अंगांचा विचार करत नाहिये. त्यामुळे पालेकर (आणि इतर चांगल निर्माते, दिग्दर्शक ) एवढ्या छोट्या जीव असलेल्या कथांवर चित्रपट का बनवतात हि 'पहेली' मला पडली. एक(च) अपवाद म्हणजे 'देवराई'. हिंदी पिक्चर मधे अतुल आणि सोनाली कुलकर्णी या दोघांनीही फार साधारण भुमिका करुन माझी निराशा केली होती. पण ह्या एक पिक्चरने सर्व भरपाई केली. सर्वच अंगानी ह चित्रपट सुरेख आहे. हिंदीतल्या 'पॅरलेल' सिनेमांसारखी मराठीत लाट आली आहे कि काय असे वाटु लागले आहे. चोखंदळ रसिकांसाठी हि नक्कीच चांगली बातमी आहे.

तरिही महेश कोठारेचा 'खबरदार' पाहयची दुर्बुद्धी मला झालीच, तुम्हाला होवु नये हि प्रार्थना :-)

Friday, October 07, 2005

गांधीजयंती 2-Oct-2005

२-१०-२००५

गांधीजींची १३६वी जयंती. नेहमी प्रमाणे राजघाटावर प्रतिष्ठित मंडळींनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. वृत्तपत्र आणि टिव्ही वरही अनेक वाहिन्यानी राष्य्रपित्यावर आधारित कार्यक्रम सादर केले. (त्यांना तेवढी चाड ठेवणे भाग आहे.) जुन्या गांधीवादी लोकांची मुलाखत ही दाखवली. तेवढीच जाणीव झाली कि आजही त्यांचे तत्वज्ञान काही लोक पालन करत आहेत. पर्वाच एक नवीन पिक्चर रिलीज झाला "मैने गांधी को नही मारा". अजून तरी मी काही पाहिला नाही पण त्याच संदर्भात काही विचार मात्र आज डोकयात पिंगा घालून गेले. प्रश्न हा पडला की आज आपण राष्य्रपिता म्हणून ज्याना आपण जाणतो, त्यांच्या आयुष्या बद्दल आजच्या समाजात किती जागरूकता आहे. इतिहासात आपण जे शिकतो ते सोडून द्या, कारण त्याचा हेतू काही वेगळाच असतो हे काही सांगायची आवश्यकता नाही. आमच्या आणि त्या आधीच्या पिढी साठी गांधीजी कधीच फार आदरणीय नव्हते. म्हणजे पाठ्यपुस्तकांनी तसे ठसवण्याचा खूप प्रयत्न केला पण गांधी विरोध ही एक प्रकारची फॅशन होती, नाहीतरी मराठी माणसांना आदराची स्थाने बरीच असतात. सावरकरांविषयी अभिमान लहानपणीच भिनला होता. लोकमान्य टिळक, आगरकर वगैरे ही सुद्धा आदराची स्थाने, मराठी म्हणून जरा अधिकच. गांधीजींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे कधीच पटले नाहीत, उलट टिळक असते तर जरा अजून लवकर मिळाले असते असा बऱ्याच जणांचे ठाम मत होते. गांधी आणि तत्कालीन कॉंग्रेस जनांनी सावरकरांचा दुस्वास करून त्यांची उपेक्षाच केली म्हणून त्यांच्याविषयी विशेष राग होता. अहिंसा हा प्रकार ही आमच्या विशेष आवडीचा कधी झाला नाही. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढ करणे हा शुद्ध बावळटपणा आहे असे आमचे ठाम मत होते. एकंदरीतच आमचे बरेच बालपण गांधी तत्वज्ञान विरोधातच गेले. कॉलेजच्या काळात ह्या विषयांना फार काही महत्व नव्हते कारण मुळात अभ्यासक्रमात ह्या गोष्टी नव्हत्या, आणि इंजिनियरिंग कॉलेजच्या काळात गांधी विषयी अभ्यास करून बोलणे हे बावळतपणाचे लक्षण मानले गेले असते. असो नोकरी लागल्यवरही चित्र अर्थातच पालटणार नव्हते.

दरम्यानच्या काळात टिव्ही आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फार प्रगती होत गेली. त्यामुळे बऱ्याच विषयांवरील विविध लोकांची मते कानावर पडू लागली. काहि मते आतापर्यंतच्या समजुतींना बळकटी आणणारी होती तर काही समुळ हादरा देणारी होती. बाकी काही असो पण प्रत्येक गोष्ट एककल्ली पणे पाहणे बरोएबर नाहि हे ही जाणवले. अनेक तज्ञांची ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फरक असलेली मते ऐकल्यावर जाणवले कि आपली मते बनवण्या आधी विषयाचा योग्य अभ्यास असणे आवश्यक आहे. इंटरनेट हाताशी असल्याने हव्या त्या विषयावरची माहिती मिळवणे सोपे होत गेले. मग प्रत्येक विषयावर आपली पुर्वापार असलेली मते तपासुन पाहण्याची सवय जडवयाला लागली. अर्थातच प्रत्येक वेळा असा अभ्यास करणे शक्य होत नाही, पण निदान टोकाची मते वनवण्याची सवय निघून जाते.

ह्याच पार्श्वभूमीवर गांधीजींच्या कार्याकडे पाहतो तेव्हा जाणीव होते कि आपल्या समाजाला खरे गांधी कळलेच नाहीत, किंवा कळून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. कारण आपल्या प्रस्थापित मतांविरुद्ध काहि निष्पन्न झाले तर आपल्याला ते परवडणारे नसते. हे विधान जवळपास प्रत्येक मोठ्या व्यक्तिंबाबत लागु पडू शकते. आपण ह्यांच्या मोठेपणाविषयी एवढे आग्रही असतो कि सर्वसाधारण माणुस म्हणुन त्यांच्याकडे पाहणे अशक्य होऊन जाते. गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला, सत्याचा मार्ग धरला, समाजातील अस्पॄश्यते सारख्या वाइट प्रथा मोडुन काढण्यासाठी स्वतःच्या आचरणातून धडा घालून दिला. सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो करोंडो लोकांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरित केले. चरखा प्रयोगा द्वारे जणु त्यांनी सर्व देशाची नसच पकडली होती. देशासाठी काही अर्पण करणे ही भावनाच खास होती ज्याद्वारे करोडो अशिक्षित लोकांमधे त्यानी देशप्रेमाची भावना जागॄत केली. आधुनिक जगातील हा एखादा चमत्कारच मानायला पाहिजे. गांधींचे अहिंसा तत्वज्ञान आज आपल्याला पटण्यासारखे नसेल, मुस्लिमधर्जिणेपणा केला म्हणुन बऱ्याच हिंदुंना राग असेल, फाळणी आणि त्यातून उद्भवलेल्या कत्तलीला नकळत पणे ते थोड्या अंशी जबाबदार असतील पण म्हणुन गांधीजी सर्वस्वी तिरस्करणीय होत नाहीत. उलटप्रकारे एखाद्या उपेक्षित व्यक्तिंचा चांगुलपणा पाहणे ही आपल्याला सहन होत नाही. गांधी मोठे म्हणून त्यांच्या समकालीन पण विरुद्ध विचारसरणीच्या लोकांचे इतिहासातील महत्व कमी होत नाही.

सारांश काय तर भारतीय म्हणून आपल्याला ज्यांचा अभिमान आहे त्यांची योग्य ओळख आपल्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. काळच एखाद्याचा मोठेपणा ठरवेल, आपण फक्त निरपेक्ष मुल्य करायला आपण शिकलो पाहिजे. नाहीतर असे अनेक गांधीजयंती दिवस येउन जातील पण कोणाला त्याचे सोयरसुतक नसेल.

Saturday, June 18, 2005

भावलेल्या कविता

बहर फुलांचा सरून गेला,
बघता बघता देठही सुकला
जरी पाकळी गळून गेली
कळी एकदा फुलली होती
--- इंदिरा संत

उतारवयातील आयुष्याशी जवळीक सांगणारी ही कविता आहे. तारुण्यातील तो बहर जरी आता संपून गेला असला तरी आठवणींच्या रुपाने तो आपल्या सोबत राहतो.


सर्व काही देता यावे,
श्रेय ही उरू नये हाती
--- करंदीकर

लहनपणी शिकलेली कवितेतली ही ओळ मनात घर करून राहीली आहे. कर्मयोगाची भावना एक ओळीत व्यक्त केलेली आहे. आपले कर्तव्य करावे आणि फळाचाही त्याग करून इश्वरचरणी अर्पण करावे. हीच भावना शब्दशः जगता येणे म्हणजे आयुष्याचे सार्थक होणे.

जीवन (jeevana)

आयुष्य हे कधीच साच्यात ठरवल्याप्रमाणे जगता येत नाही, किंवा जगायचे ही नसते. आयुष्याचे दुसरे नाव जीवन आहे, जीवन मणजे पाणी. पाण्याप्रमाणेच आयुष्य खळखळून जगावे, पाण्याप्रमाणेच त्याला स्वतःचा मार्ग धुंडाळू द्यावा. आणि शेवटी पाण्याप्रमाणेच अनंत सागरात विलीन व्हावे. आयुष्यातील महत्वाचे टप्पे ही पाण्याशी संगती सांगतात. बालपण म्हणजे उगम पावणाऱ्या झऱ्याप्रमाणे असते, डोंगरदऱ्यातून खळाळणाऱ्या पाण्याचे हे तारुण्य रुप असते. पुढे हेच पाणी मोठ्या नदीचे रूप धारण करते. त्याचा वेग कमी होत जाउन व्याप्ती वाढते. अनेक नवीन जीवन प्रवाह त्याला येउन मिळतात. आणि या वॄद्धावस्थे नंतर अंतःकाली शेवटी सागरात ही नदी विलीन होऊन जाते.

अश्वथामा (ashvatthama)

महाभारतातील अजुन एक वेगळे व्यक्तित्व म्हणजे अश्वथामा. त्याची भाळी न भरणारी जखम वागवून असतो. अश्वथामा अमर मानला गेला आहे, ते बहुधा सांकेतिक असावे. सर्व मानव जातीत तो अंश रुपाने उरला आहे, म्हणुनच आपण सर्व आपल्या दुःखाचे सतत ओझे बाळगुन फिरत असतो. प्रत्येक दुःख आपल्या अपरिपुर्णतेच्या दुःखाची जखम कधी भरु देत नाही. ह्या अश्वथाम्याला मुक्ती देणे आपले कर्तव्य आहे.

कर्ण (KarNa)

महाभारतातील कर्णाची व्यक्तिरेखा बहुतेक व्यक्तिंना आवडते. कर्णाचे रुप, असामान्य शौर्य, दानशूरता, अभिमानी पणा हे भुरळ पाडून जाते. पण कर्णाची व्यक्तिरेखा अधिक भावण्याचे कारण म्हणजे, त्याच्या आयुष्याशी आपल्याला जाणवणारे साधर्म्य. एवढ्या पराक्रमी, सामर्थ्यवान पुरुषालाही नशिबाच्या फेऱ्याने सोसायला लावलेले अपयश, अपमान. स्वतःच्या श्रेष्ठ्त्वाची पुर्ण कल्पना असुनही क्षणोक्षणी भोगायला लागणारे अपयशाचे चटके, आणि आपला पराभव अटळ आहे तरिही आपल्या स्वधर्माशी न केलेली प्रतारणा आपल्याला जास्त भावते. आनंदाच्या क्षणातही दुःखाचे क्षण रुतावे, यशाच्या शिखरावर असतानांही पराजितांच्या रांगेत बसायला लागावे, याहुन अधिक दुःखदायक ते काय असावे. कर्णाने हे सर्व सोसले आणि त्याच्या त्यागाने तो मोठा ठरला. आपणही आयुष्यात कधीनाकधी कर्णाची भुमिका पार पाडत असतो आणि यशातही अपयशाचे दुःखच सोसत असतो. म्हणुनच कर्ण आपल्या मनात घर करुन राहातो.

Sunday, June 12, 2005

यज्ञ (Yadnya)

आयुष्य कर्मयोगात जगणे कठिण वाटते. मनावर फार ताबा ठेवून मनाला कुठे भटकू न देणे हे काम आयुष्य भर न थकता करत राहणे हे सोपे काम नाही. कधी तरी मन थकणारच, बंड ही करेल, पण पुन्हा त्याचा ताबा घेउन पुन्हा सुरुवात करावी लागते. हे मनच त्यात इतके अडथळे निर्माण करेल, की आयुष्य चुकीच्या पद्धतीने जगतो आहे कि काय असे वाटू शकते. तेव्हा न थांबता निरंतर, अखंड पणे चालतच राहायचे असते. शेवटी हे आयुष्य म्हणजे एक यज्ञच आहे. त्यात स्वतःचीच आहुती द्यायची असते.