Sunday, February 12, 2006

आकाशवाणी मुंबई केंद्र....

"आकाशवाणी मुंबई केंद्र. सकाळची ७ वाजून ५ मिनिटे झाली आहेत. आता आम्ही पुणे केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत". हे वाक्य कानावर पडून बरेच वर्ष झाली आहेत. पण अजूनही या वाक्याची जादू माझ्यासाठी कमी झालेली नाही. अजुनही भूतकाळाच्या, बालपणाच्या आठवणीत आकाशवाणीचे महत्वाचे स्थान आहे. लहानपणी माझ्या दिवसाची सुरूवात रेडिओने व्हायची. ७:३० ची सकाळची शाळा, तेव्हा वेळेत तयार होण्यासाठी आई ६-६:१५ ला उठवायची. सकाळचे अभंग सुरू असायचे. प. भीमसेन जोशींचे लोकप्रिय अभंग कानवर पडायची हीच वेळ. 'तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल', 'सावळे सुंदर' या सारख्या अभंगांची गोडी तेव्हाच नकळत लागली. त्याच बरोवर लता मंगेशकरांच्या आवाजात 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन' सारख्या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगानी दिवसाची परफेक्ट सुरूवात व्हायची. ७ वाजता आरोग्य धनसंपदा सादर व्हायचे, सादरकरत्या होत्या 'सुषमा हेप्पळगावकर'. ५ मिनिंटांचे हे सुंदर सदर. पुढे प्रादेशिक बातम्या आणि कोकणीतल्या 'खोबरो'. फारश्या कळायच्या नाहित, पण ऐकायला फार आवडयच्या, त्यावेळी मी त्याला कोकणी खोबरं म्हणायचो. सकाळच्या वेळीच आकाशवाणी विविध वस्तूंचे दर प्रसारित करायचे, बहुतेक व्यापाऱ्यांसाठी हे सदर होते, कारण दर क्विंटल मधे असायचे. आकाशवाणी च्या बातम्यांचे एक वैशिठ्य होते, ते म्हणजे वृत्तनिवेदकांची बोलण्याची लकब किंवा पद्धत. मल हि पद्धत फार आवडायची, म्हणुन कि काय धडे वाचताना मी त्याच पद्धतीने वाचायचो. सकाळी ११ वाजता 'कामगार बंधुसाठी' गाण्याचा सुरेख कार्यक्रम असायचा आणि दुपारी १ वाजत 'भगिनी समाजासाठी वनिता मंडळ' सादर केले जायचे, याचे सुरूवातीचे संगीत फार छान होते, आत फारसे आठवत नाही. बालगीतांची मेजवानी सुद्धा आकशवाणी पुरवत असे, 'नाचरे मोरा' पुस्तकात शिकायच्या आधीपासून तोंडपाठ होते. 'टप टप टाकीत टापा', 'सांग सांग भोलानाथ', 'या बकुळीच्या झाडाखाली' हि गाणी आजही मनात रुंजी घालत आहेत, तर पाउस पडताना 'ए आई मला पावसात जाउदे' अजुनही आठवते. बहुतेक ८-८:१५ वाजता भावगीतांचा सुरेख कार्यक्रम असायचा, कॉलेजच्या काळात घरातून उशिरा निघत असल्याने दिवसाची सुरूवात त्यानेच व्हायची. भावगीतांबरोबर नाट्यगीतांची आवडही त्या काळात आकाशवणीनेच पोसली. एकुणच आकशवाणीने केलेली वातावरण निर्मिती अतिशय सकस होती, कुठलाही डमडौल न वागवता एक स्वत:चा श्रोतृवर्ग तयार केला, जोपासला, म्हणुनच त्याची मोहिनी अजुनही मनात कायम आहे.

आजच्या काळात दिवसाची सुरूवात आकाशवाणीने होत नाही, ती जागा इच्छा नसतानाही 'एफ़ एम' रेडिओने घेतली आहे. पण अजुनही वाटते कि पुन्हा एकदा तेच आवाज कानावर पडावेत आणि पहिल्यासारखीच दिवसाची एक 'परफेक्ट' सुरूवात व्हावी. ...समाप्त.