Friday, October 07, 2005

गांधीजयंती 2-Oct-2005

२-१०-२००५

गांधीजींची १३६वी जयंती. नेहमी प्रमाणे राजघाटावर प्रतिष्ठित मंडळींनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. वृत्तपत्र आणि टिव्ही वरही अनेक वाहिन्यानी राष्य्रपित्यावर आधारित कार्यक्रम सादर केले. (त्यांना तेवढी चाड ठेवणे भाग आहे.) जुन्या गांधीवादी लोकांची मुलाखत ही दाखवली. तेवढीच जाणीव झाली कि आजही त्यांचे तत्वज्ञान काही लोक पालन करत आहेत. पर्वाच एक नवीन पिक्चर रिलीज झाला "मैने गांधी को नही मारा". अजून तरी मी काही पाहिला नाही पण त्याच संदर्भात काही विचार मात्र आज डोकयात पिंगा घालून गेले. प्रश्न हा पडला की आज आपण राष्य्रपिता म्हणून ज्याना आपण जाणतो, त्यांच्या आयुष्या बद्दल आजच्या समाजात किती जागरूकता आहे. इतिहासात आपण जे शिकतो ते सोडून द्या, कारण त्याचा हेतू काही वेगळाच असतो हे काही सांगायची आवश्यकता नाही. आमच्या आणि त्या आधीच्या पिढी साठी गांधीजी कधीच फार आदरणीय नव्हते. म्हणजे पाठ्यपुस्तकांनी तसे ठसवण्याचा खूप प्रयत्न केला पण गांधी विरोध ही एक प्रकारची फॅशन होती, नाहीतरी मराठी माणसांना आदराची स्थाने बरीच असतात. सावरकरांविषयी अभिमान लहानपणीच भिनला होता. लोकमान्य टिळक, आगरकर वगैरे ही सुद्धा आदराची स्थाने, मराठी म्हणून जरा अधिकच. गांधीजींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे कधीच पटले नाहीत, उलट टिळक असते तर जरा अजून लवकर मिळाले असते असा बऱ्याच जणांचे ठाम मत होते. गांधी आणि तत्कालीन कॉंग्रेस जनांनी सावरकरांचा दुस्वास करून त्यांची उपेक्षाच केली म्हणून त्यांच्याविषयी विशेष राग होता. अहिंसा हा प्रकार ही आमच्या विशेष आवडीचा कधी झाला नाही. एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढ करणे हा शुद्ध बावळटपणा आहे असे आमचे ठाम मत होते. एकंदरीतच आमचे बरेच बालपण गांधी तत्वज्ञान विरोधातच गेले. कॉलेजच्या काळात ह्या विषयांना फार काही महत्व नव्हते कारण मुळात अभ्यासक्रमात ह्या गोष्टी नव्हत्या, आणि इंजिनियरिंग कॉलेजच्या काळात गांधी विषयी अभ्यास करून बोलणे हे बावळतपणाचे लक्षण मानले गेले असते. असो नोकरी लागल्यवरही चित्र अर्थातच पालटणार नव्हते.

दरम्यानच्या काळात टिव्ही आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात फार प्रगती होत गेली. त्यामुळे बऱ्याच विषयांवरील विविध लोकांची मते कानावर पडू लागली. काहि मते आतापर्यंतच्या समजुतींना बळकटी आणणारी होती तर काही समुळ हादरा देणारी होती. बाकी काही असो पण प्रत्येक गोष्ट एककल्ली पणे पाहणे बरोएबर नाहि हे ही जाणवले. अनेक तज्ञांची ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फरक असलेली मते ऐकल्यावर जाणवले कि आपली मते बनवण्या आधी विषयाचा योग्य अभ्यास असणे आवश्यक आहे. इंटरनेट हाताशी असल्याने हव्या त्या विषयावरची माहिती मिळवणे सोपे होत गेले. मग प्रत्येक विषयावर आपली पुर्वापार असलेली मते तपासुन पाहण्याची सवय जडवयाला लागली. अर्थातच प्रत्येक वेळा असा अभ्यास करणे शक्य होत नाही, पण निदान टोकाची मते वनवण्याची सवय निघून जाते.

ह्याच पार्श्वभूमीवर गांधीजींच्या कार्याकडे पाहतो तेव्हा जाणीव होते कि आपल्या समाजाला खरे गांधी कळलेच नाहीत, किंवा कळून घ्यायचा प्रयत्नच केला नाही. कारण आपल्या प्रस्थापित मतांविरुद्ध काहि निष्पन्न झाले तर आपल्याला ते परवडणारे नसते. हे विधान जवळपास प्रत्येक मोठ्या व्यक्तिंबाबत लागु पडू शकते. आपण ह्यांच्या मोठेपणाविषयी एवढे आग्रही असतो कि सर्वसाधारण माणुस म्हणुन त्यांच्याकडे पाहणे अशक्य होऊन जाते. गांधीजींनी अन्यायाविरुद्ध लढा सुरू केला, सत्याचा मार्ग धरला, समाजातील अस्पॄश्यते सारख्या वाइट प्रथा मोडुन काढण्यासाठी स्वतःच्या आचरणातून धडा घालून दिला. सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो करोंडो लोकांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरित केले. चरखा प्रयोगा द्वारे जणु त्यांनी सर्व देशाची नसच पकडली होती. देशासाठी काही अर्पण करणे ही भावनाच खास होती ज्याद्वारे करोडो अशिक्षित लोकांमधे त्यानी देशप्रेमाची भावना जागॄत केली. आधुनिक जगातील हा एखादा चमत्कारच मानायला पाहिजे. गांधींचे अहिंसा तत्वज्ञान आज आपल्याला पटण्यासारखे नसेल, मुस्लिमधर्जिणेपणा केला म्हणुन बऱ्याच हिंदुंना राग असेल, फाळणी आणि त्यातून उद्भवलेल्या कत्तलीला नकळत पणे ते थोड्या अंशी जबाबदार असतील पण म्हणुन गांधीजी सर्वस्वी तिरस्करणीय होत नाहीत. उलटप्रकारे एखाद्या उपेक्षित व्यक्तिंचा चांगुलपणा पाहणे ही आपल्याला सहन होत नाही. गांधी मोठे म्हणून त्यांच्या समकालीन पण विरुद्ध विचारसरणीच्या लोकांचे इतिहासातील महत्व कमी होत नाही.

सारांश काय तर भारतीय म्हणून आपल्याला ज्यांचा अभिमान आहे त्यांची योग्य ओळख आपल्या प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे. काळच एखाद्याचा मोठेपणा ठरवेल, आपण फक्त निरपेक्ष मुल्य करायला आपण शिकलो पाहिजे. नाहीतर असे अनेक गांधीजयंती दिवस येउन जातील पण कोणाला त्याचे सोयरसुतक नसेल.

1 Comments:

At 10:43 PM, Blogger Amruta said...

Hi,
Saw your comments on my blog. When checked, your very first blog about gandhi jayanti grabbed my immediate attention. I share the same opinion with you sent percent. :)

 

Post a Comment

<< Home