Saturday, June 18, 2005

भावलेल्या कविता

बहर फुलांचा सरून गेला,
बघता बघता देठही सुकला
जरी पाकळी गळून गेली
कळी एकदा फुलली होती
--- इंदिरा संत

उतारवयातील आयुष्याशी जवळीक सांगणारी ही कविता आहे. तारुण्यातील तो बहर जरी आता संपून गेला असला तरी आठवणींच्या रुपाने तो आपल्या सोबत राहतो.


सर्व काही देता यावे,
श्रेय ही उरू नये हाती
--- करंदीकर

लहनपणी शिकलेली कवितेतली ही ओळ मनात घर करून राहीली आहे. कर्मयोगाची भावना एक ओळीत व्यक्त केलेली आहे. आपले कर्तव्य करावे आणि फळाचाही त्याग करून इश्वरचरणी अर्पण करावे. हीच भावना शब्दशः जगता येणे म्हणजे आयुष्याचे सार्थक होणे.

जीवन (jeevana)

आयुष्य हे कधीच साच्यात ठरवल्याप्रमाणे जगता येत नाही, किंवा जगायचे ही नसते. आयुष्याचे दुसरे नाव जीवन आहे, जीवन मणजे पाणी. पाण्याप्रमाणेच आयुष्य खळखळून जगावे, पाण्याप्रमाणेच त्याला स्वतःचा मार्ग धुंडाळू द्यावा. आणि शेवटी पाण्याप्रमाणेच अनंत सागरात विलीन व्हावे. आयुष्यातील महत्वाचे टप्पे ही पाण्याशी संगती सांगतात. बालपण म्हणजे उगम पावणाऱ्या झऱ्याप्रमाणे असते, डोंगरदऱ्यातून खळाळणाऱ्या पाण्याचे हे तारुण्य रुप असते. पुढे हेच पाणी मोठ्या नदीचे रूप धारण करते. त्याचा वेग कमी होत जाउन व्याप्ती वाढते. अनेक नवीन जीवन प्रवाह त्याला येउन मिळतात. आणि या वॄद्धावस्थे नंतर अंतःकाली शेवटी सागरात ही नदी विलीन होऊन जाते.

अश्वथामा (ashvatthama)

महाभारतातील अजुन एक वेगळे व्यक्तित्व म्हणजे अश्वथामा. त्याची भाळी न भरणारी जखम वागवून असतो. अश्वथामा अमर मानला गेला आहे, ते बहुधा सांकेतिक असावे. सर्व मानव जातीत तो अंश रुपाने उरला आहे, म्हणुनच आपण सर्व आपल्या दुःखाचे सतत ओझे बाळगुन फिरत असतो. प्रत्येक दुःख आपल्या अपरिपुर्णतेच्या दुःखाची जखम कधी भरु देत नाही. ह्या अश्वथाम्याला मुक्ती देणे आपले कर्तव्य आहे.

कर्ण (KarNa)

महाभारतातील कर्णाची व्यक्तिरेखा बहुतेक व्यक्तिंना आवडते. कर्णाचे रुप, असामान्य शौर्य, दानशूरता, अभिमानी पणा हे भुरळ पाडून जाते. पण कर्णाची व्यक्तिरेखा अधिक भावण्याचे कारण म्हणजे, त्याच्या आयुष्याशी आपल्याला जाणवणारे साधर्म्य. एवढ्या पराक्रमी, सामर्थ्यवान पुरुषालाही नशिबाच्या फेऱ्याने सोसायला लावलेले अपयश, अपमान. स्वतःच्या श्रेष्ठ्त्वाची पुर्ण कल्पना असुनही क्षणोक्षणी भोगायला लागणारे अपयशाचे चटके, आणि आपला पराभव अटळ आहे तरिही आपल्या स्वधर्माशी न केलेली प्रतारणा आपल्याला जास्त भावते. आनंदाच्या क्षणातही दुःखाचे क्षण रुतावे, यशाच्या शिखरावर असतानांही पराजितांच्या रांगेत बसायला लागावे, याहुन अधिक दुःखदायक ते काय असावे. कर्णाने हे सर्व सोसले आणि त्याच्या त्यागाने तो मोठा ठरला. आपणही आयुष्यात कधीनाकधी कर्णाची भुमिका पार पाडत असतो आणि यशातही अपयशाचे दुःखच सोसत असतो. म्हणुनच कर्ण आपल्या मनात घर करुन राहातो.

Sunday, June 12, 2005

यज्ञ (Yadnya)

आयुष्य कर्मयोगात जगणे कठिण वाटते. मनावर फार ताबा ठेवून मनाला कुठे भटकू न देणे हे काम आयुष्य भर न थकता करत राहणे हे सोपे काम नाही. कधी तरी मन थकणारच, बंड ही करेल, पण पुन्हा त्याचा ताबा घेउन पुन्हा सुरुवात करावी लागते. हे मनच त्यात इतके अडथळे निर्माण करेल, की आयुष्य चुकीच्या पद्धतीने जगतो आहे कि काय असे वाटू शकते. तेव्हा न थांबता निरंतर, अखंड पणे चालतच राहायचे असते. शेवटी हे आयुष्य म्हणजे एक यज्ञच आहे. त्यात स्वतःचीच आहुती द्यायची असते.